‘करवीर’मधील कोविड उपचार केंद्रांच्या बिलाची मिळाली नाही दमडी…

0
124

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत करवीर तालुक्यात सुरू केलेल्या चार कोविड उपचार केंद्रांच्या चहा, नाश्ता, जेवण, पाणी पुरवणाऱ्याचे  आणि साफसफाईचे ७० लाखांपेक्षा अधिक बिल अद्याप शासनाकडून मिळालेले नाही. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफचाही दोन महिन्याचा पगार दिलेला नाही. जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकण्याचा प्रकार घडल्यामुळे कंत्राटदारांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर, कुडित्रे, कुरुकली आणि केआयटी कॉलेज येथे शासनामार्फत एप्रिल महिन्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या चार सेंटरसाठी खाजगी कंत्राटदारास चहा, नाश्ता, जेवण आणि पाणी देण्याचा ठेका देण्यात आला होता. कंत्राटदाराने लाखो रुपयांची पदरमोड करून सर्व साहित्यांचा पुरवठा केला. त्याचे बिलही जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. यानंतर कोरोना रुग्ण कमी झाले. कोविड सेंटर्स बंद झाली. पण नाश्ता, जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारांची बिलाची मात्र एक दमडीही अद्याप देण्यात आलेली नाही.

एप्रिल ते जुलैपर्यंतचे जेवणाचे ५५ लाख रुपये आणि साफसफाईचे २० लाख रुपये शासनाकडून अद्याप ठेकेदारास मिळालेले नाही. यामुळे ठेकेदाराने चहा, नाश्ता, जेवण, पाणी पुरवले पण अखेरच्या दिवसात अंडी आणि काही खाद्यपदार्थ पुरवू शकला नाही. तसेच जेवण देणाऱ्या आणि साफसफाई करणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप ठेकेदार देऊ शकलेला नाही.

या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या ७५ नर्सिंग स्टाफचे एप्रिल आणि मे महिन्यातील एकूण ३७ दिवसाचे पेमेंट अदा केले आहे. पण जून आणि जुलैचे मात्र अद्याप प्रलंबित आहे. ही रक्कमही काही लाखाच्या घरात आहे. कोरोना प्रतिबंध आणि उपचारासाठी कोट्यावधीचा निधी शासनाकडून आला असताना या कोविड सेंटरमधील लाखोंची बिले का प्रलंबित ठेवली आहेत याबाबत संबंधित विभागाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे सेवाभावी वृत्ती आणि गरजेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रचंड आर्थिक गुंतवणूक करून सेवा देणाऱ्यांचे  पैसे मिळत नसतील तर आगामी काळात कोरोनाची  तिसरी लाट आलीच तर अशा सेवा देणाऱ्या संस्था आणि व्यक्ती काम करण्यास पुढे येतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.