‘यांना’ मंदिरात प्रवेश बंदी कायम

0
90

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना आजारामुळे बंद असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने सोमवारपासून (दि.१६)  परवानगी दिली आहे. त्याबाबतचा  आदेश जिल्हा प्रशासनाने आज (रविवारी) काढला. पण मास्क न लावणाऱ्यांना आणि कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांना प्रवेशबंदी कायम केली आहे. शिवाय दर्शनावेळी कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी विविध खबरदारी घेण्याच्या सूचना मंदिर प्रशासनास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने अधिकृतपणे आदेश दिल्यामुळे येथील अंबाबाई आणि जोतिबा मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारिमधील मंदिरे, चर्चसह इतर धर्मियांची प्रार्थना स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी खुली झाली. पण कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. ६५ वर्षावरील भक्त, विविध आजाराने ग्रस्त, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील मुलांना दर्शनासाठी गर्दीत आणू नये, चेहरा पट्टी किंवा मास्क वापरणे, दर्शनासाठी येणाऱ्यांचे निरीक्षण सेवेकऱ्यांनी करून कोरोनासंबंधीची लक्षणे असल्यास आरोग्य प्रशासनास कळवावे, सार्वजनिक ठिकाण थुंकू नये, थुंकल्यास दंड करावे, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाने आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रवेशव्दारावरच हात स्वच्छतेसाठी सॅनिटाझर देणे, थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे, दोन भाविकांत सुरक्षित अंतर असावे, अशा विविध सेवा, उपाययोजना मंदिर, प्रार्थनास्थळ व्यवस्थापकांनी करण्याची सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.