पुणे (प्रतिनिधी) : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गणेशाच्या आगमनाच्या दिवशी दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी उशिरापर्यंत शहराच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशाच्या मिरवणुका आणि प्रतिष्ठापना दुपारपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे त्यात पावसाचा अडथळा आला नाही; मात्र दुपारनंतरही मिरवणुका असलेल्या मंडळांना त्याचा काहीसा फटका बसला असला, तरी भर पावसातही काही मंडळांच्या मिरवणुका सुरूच होत्या.

गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांत पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार राज्याच्या विविध भागांत गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी रात्रीही जोरदार पाऊस झाला. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशीही शहरात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती. शहरात सकाळी आणि दुपारपर्यंत आकाशाची स्थिती निरभ्र होती; मात्र हवेत प्रचंड उकाडा निर्माण झाला होता.

दुपारी साडेतीननंतर आकाशात मोठ्या प्रमाणावर ढग जमा होण्यास सुरुवात झाली. काही भागांत ढगांचा गडगडाटही सुरू झाला. साडेचारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाचा जोर होता. शहरात काही मंडळाच्या गणेश आगमनाच्या मिरवणुका दुपारनंतर सुरू झाल्या होत्या. त्यात पावसामुळे अडथळा आला. भर पावसातही ढोल-ताशांचा दणदणाट सुरूच होता. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारीही (१ सप्टेंबर) शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावासाची शक्यता आहे.