मुंबई (प्रतिनिधी) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरातील चाहते आज त्यांना आदरांजली वाहत आहेत. लतदीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवन प्रवास आता एका माहितीपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सम्राज्ञी या माहितीपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार मयुरेश पै हे करणार आहेत. 

लतादीदींच्या जन्मदिनी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि  लतिका क्रिएशन्स हे सम्राज्ञी या माहितीपटाची निर्मिती करणार आहेत. लतादीदींचा जीवनपट उलगडणारी ही डॉक्युमेंटरी असणार आहे. मराठीतील  अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. एल. एम. म्युझिकचे सीईओ-संगीतकार मयुरेश पै आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया या दोघांनी हे शिवधनुष्य उचललेले आहे. ही डॉक्युमेंट्री मयुरेश पै दिग्दर्शित करत आहेत.

लता मंगेशकरांचा २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक, नाट्य कलावंत होते. लतादीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लतादीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून,२० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला.