‘या’ मागण्यांसाठी अंकुश संघटनेतर्फे ठिय्या

0
62

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या गळीत हंगामात ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांआत एकरकमी एफआरपी द्यावी, पाच टक्के मोळी बांधणी वजावट रद्द करावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंकुश सामाजिक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देवून आंदोलनाची सांगता केली.

मशीनने ऊस तोडणी केल्यानंतर मोळी वजावटपोटी पाच टक्के कारखान्यांकडून कपात केली जात आहे. यामुळे ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. म्हणून ती कपात रद्द करावी, कारखान्यावर ऊस भरून आल्यानंतर वाहनांचे पहिल्यांदा वजन करून मगच रांगेत थांबवावे, रांगेत थांबवून वजन केले जात असल्याने उत्पादकांचे नुकसान होत आहे. वाड्याचा निम्मा हिस्सा फड मालकास मिळावा, क्रमपाळीची यादी गट कार्यालयास प्रसिध्द करावी, थकीत एफआरपीच्या रकमेवरील १५ टक्याप्रमाणेचे व्याज संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, आशाराणी पाटील, शिवाजी माने आदी सहभागी झाले होते.