‘कोविशील्ड’वरील आरोप चुकीचे ; ‘त्याच्या’वर १०० कोटींचा दावा लावणार ! : ‘सीरम’चा इशारा

0
53

पुणे (प्रतिनिधी) :  ‘कोविशील्ड’ लसीवर चेन्नईतील स्वयंसेवकाने घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत. त्याने संस्थेवर केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळे संस्थेची बदनामी झाली असून त्याच्याविरोधात १०० कोटी नुकसानभरपाईचा दावा करणार असल्याचा इशारा सीरम इन्स्टिट्यूटनं दिला आहे.

‘कोव्हिशील्ड’ ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-अमेरिकन कंपनी ‘अॅस्ट्राझेनेका’ विकसित करीत आहेत. भारतात त्याचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करीत आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. मात्र, या लसीच्या प्रायोगिक डोसमुळं आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला आहे. या लसीच्या चाचण्या तातडीनं थांबवाव्यात व आपल्याला पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी चेन्नईतील स्वयंसेवकानं केली. मात्र सीरमने हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळले आहेत.

सीरमने पत्रकात म्हटले आहे की, तक्रारदाराने नोटिशीद्वारे केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याबद्दल आम्हाला सहानुभूती नक्कीच वाटते ; परंतु त्याच्या प्रकृतीतील बिघाडाचा आणि लसीचा काहीही संबंध नाही. त्यामुळं त्यानं लसीवर खापर फोडणं हा निव्वळ खोटारडेपणा आहे. त्याला जाणवणारा त्रास लसीमुळे होत नसल्याची पूर्ण कल्पना वैद्यकीय पथकाने त्याला दिली होती, तरीही त्यानं याबाबतीत जाहीर आरोप करण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या या कृत्यामुळं संस्थेची बदनामी झाली आहे. पैसे उकळण्याच्या हेतूनं त्यानं हे कृत्य केल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळं आम्हीच त्यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार दाखल आहोत.