टोप (प्रतिनिधी) : गेल्या एक महिन्यापासून शिरोली एमआयडीसी येथील ‘परफेक्ट पिन्स डी’ कंपनीसमोर कामगारांच्या विविध मागण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. तरी तत्काळ कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी श्रमिक कामगार संघटनेने केली आहे.

एक वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युइटी व कंपनीतील सर्व कामगारांचा  अंदाजे १ कोटी भविष्य निर्वाह निधीची रक्कम ताबडतोब भरावी. तसेच २०१८ – २०२२ या नवीन कराराची अंमलबजावणी करुन पगार स्लीप द्याव्यात, श्रमिक कामगार पतसंस्था येथील कामगारांच्या पगारातून कपात केलेली अंदाजे ३० लाख रक्कम ताबडतोब भरावी, पात्र कामगारांची ईएसआय रक्कम भरावी, आदी मागण्यांसाठी कामगारांचे महिन्याभरापासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्यांबाबत चालढकल सुरू आहे. आतापर्यंत ३ बैठका झाल्या असून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, तरी यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी कामगारांतून होत आहे.

या आंदोलनात कामगार प्रतिनिधी शिवाजी चेचरे, संभाजी काशिद, सुनिल कोळी, बी. एन पाटील, नामदेव पाटील, निकिल मगदूम, संभाजी राऊत, जी. डी. पाटील, पी. डी. पाटील, अशोक डोंगरे, श्रीकांत पन्हाळे, इलाई मुल्ला, पुंडलिक माने, विजय परीट आदी कामगार सहभागी झाले आहेत.