मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. विरोधकांनी मुंडे यांनी मंत्रिपदाच्या राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंडे आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडे प्रकरणात नवा ट्विटस निर्माण केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतना भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी त्यांच्याबाबतीत नेमके काय घडले याचा खुलासा केला. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या गायिका रेणु शर्मा यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा हेगडे यांनी केला आहे. ते म्हणाले, २०१० पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होत्या. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या. मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी २०१५ पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी. मी तिला स्पष्टपणे सांगितले होते, की मला तुम्हाला भेटण्यात अजिबात रस नाही, मग त्यांच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी ६ आणि ७ जानेवारी २०२१ रोजीही त्यांनी मला व्हॉट्सअॅप केले. दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याचवेळी मी रेणू शर्मा यांच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला.