सोलापूर (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ती जखम आजही राज ठाकरेंच्या मनाला बोचतेय. त्यामुळे ते अशाप्रकारची बेताल टीका करतात. अशा शब्दात नीलम गोऱ्हेंनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जे व्यंग नाहीत त्याला शोधून आणायचे आणि मिमिक्री करायची याला दूषित दृष्टी म्हणतात किंवा सडलेली दृष्टी म्हणतात. असा घणाघातही गोऱ्हेंनी केला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात मनसेनेही कार्यकर्ते, गटनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळाव्यांचा धडाका सुरु केला आहे. यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. उद्धव ठाकरेंची नक्कल करून दाखवली, यावरून आता शिवसेना नेत्यांकडून राज ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फ्रिज खोकेबाबतची टीका निराधार आहे. परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे मजबूर आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, जसे नारायण राणेंचे झाले तसेच शिंदे गटाचे झाले आहे, असे  म्हणत नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. त्यांच्यामागे नक्कीच कुणीतरी आहे. महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठी द्वेषी लोकांचा आहे असे वाटतंय, असा आरोपही नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.