कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजस्थान आणि हरियाना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गॅगस्टर पपलाने सरनोबतवाडी येथे बस्तान बसवले होते. येथे एका महिलेसोबत तो राहत होता. मात्र, जिममध्ये गेल्यानंतर त्याची ओळख दुसऱ्या प्रेयसीशी झाली. ही तरुणी आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला होती. पहिल्या पतीपासून तिचा घटस्फोट झाला होता. ती जीम चालवत असे.

पपलाची ओळख झाली आणि त्याच्या प्रेमात पडली. आपण राजस्थानातील एका राजघराण्यातील असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याने तिला दाखविलेल्या आधार कार्डावरही उदल सिंग असे नाव होते. संबधित तरुणीच्या घरच्यांनाही हे माहीत होते. पपलाने केलेल्या लुटीतील ३१ लाखांत तो आरामदायी आयुष्य जगत होता. यातील काही पैसे तो संबधित तरुणीसह अन्य तरुणींवर खर्च करत होता.

दरम्यान, सरनोबतवाडी येथील पपला राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर संबधित तरुणीला स्वतंत्रपणे राजस्थान पोलिस घेऊन गेली. वाटेत ती पोलिसांना वारंवार कौन है असे विचार होती. जेव्हा एअरपोर्टवर पपला समोर आला तेव्हा तिने त्याला कौन हो तुम? विचारले. यावर त्याने मै पपला, विक्रम गुर्जर हूं असे सांगितले आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती हमसून रडत होती. पपला सरनोबतवाडी येथे राहत असताना नीमराणा पोलिस ठाण्यातील एक कॉन्स्टेबल त्याला टीप देत होता. या आरोपावरून कॉन्स्टेबल सुधीर कुमार याला निलंबित करण्यात आले आहे. सरनोबतवाडी येथून जप्त केलेल्या कागदपत्रांवरून त्याला कोण कोण मदत करत होते याची माहिती पुढे येत आहे.