मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरु असतानाच २३ नोव्हेंबर रोजी राज्याला धक्का देणारी घटना घडली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सरकार केवळ ८० तास टिकलं.

पंरतु संपूर्ण राजकारण ढवळून काढणाऱ्या या घटनेची आज (सोमवार) वर्षपूर्ती झाली आहे. या पहाटेच्या शपथविधीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना खरमरीत शब्दात टीका केली. ते म्हणाले, ‘ती पहाट नव्हती, अंध:कारच होता. त्या अंध:कारामध्ये सत्येची प्रकाशकिरणं परत कधीच दिसणार नाहीत. पुढील चार वर्षे तरी पुन्हा निवडणुका होणार नाहीत. त्यानंतर पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेलेच नाहीत. आम्हाला धक्का अजिबात बसला नव्हता, आमच्या स्मृती आनंददायी, सुखदायी आहेत, त्या पहाटेच्यावेळी सुद्धा. पहाटेनंतर त्यांना जे धक्के बसले, त्यातून ते सावरलेले नाहीत. ती पहाट पुन्हा उजाडणार नाही.’