कोल्हापुरातील ‘ती’ कोविड केअर सेंटर्स तात्पुरती बंद…

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. शहरातील ज्या कोव्हिड केअर सेंटर्समध्ये सध्या रुग्ण नाहीत, अशी सेंटर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य व्यवस्थेतील यंत्रणांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवार) ही बैठक पार पडली.

रुग्णांअभावी रिकामी असलेली कोव्हिड केअर सेंटर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करताना त्या ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन पाईनलाईन त्याच ठिकाणी सुस्थितीत ठेवाव्यात. कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा विनियोग करणे सोईचे होणार आहे. याबरोबरच शासनाकडून जिल्ह्यासाठी प्राप्त होणारे आरटीपीसीआर आणि ॲन्टीजेन किट शासनस्तरावरुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्राप्त करुन घेण्याची सूचना आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. तसेच सीपीआर हॉस्पिटल ५० टक्के नॉन कोव्हिड रुग्णांसाठी सुरु करण्याची सूचनाही या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीस जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, महापालिका उपायुक्त निखिल मोरे, राजर्षि शाहू छत्रपती महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.