ठाकरे माझे दैवत पण शिंदे माझे गूरू : राजेश क्षीरसागर

0
407

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही पक्षाचा आदेश शिरसंधानी बांधून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला. पण, आजची परीस्थिती अत्यंत वेगळी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुरु आहेत. या दोघांनीही पुन्हा एकत्र यावे. २००४ पासूनच्या राजकीय जीवनात शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांची अखंडित साथ मिळाली आहे. त्यामुळे कुटुंब म्हणून सर्वजण एकत्रीत आहोत आणि पुढील काळातही असेच एकत्र राहूया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या आयोजित बैठकीत केले.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक आहे. माझी भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. २००४ मध्ये अनेक दिग्गज शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पदाची जबाबदारी दिली. या पदाला न्याय देत असताना शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या कोल्हापूर शहरप्रमुख पदावर नियुक्ती झाली. यानंतर शहरातील जुन्या-नव्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे नेतृत्व करीत जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. यासह जनसेवेची अनेक कामे केली असून याचेच फलित म्हणून शिवसेनेने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची उमेदवारी मिळाली आणि आमदार होण्याचा मान मिळाला.

यानंतर विरोधी पक्षात काम करताना मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले. यासह विकास कामांच्या माध्यमातून शहराचा विकासही साधला. टोल, एलबीटी, थेट पाईपलाईन अशा देशव्यापी आणि राज्यव्यापी प्रश्नात अग्रभागी राहून जनतेला न्याय दिला. यानंतर पुन्हा २०१४ मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. यावेळी युती सरकारच्या मंत्री मंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता होतीच, पण प्रथम प्राधान्याने नावाची चर्चा होवूनही दोनवेळा मंत्री पदाने हुलकावणी दिली. पण यामुळे पक्षश्रेष्ठींवर नाराज न होता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आलो.

यानंतरच्या निवडणुकीत पराभूत होवूनही न थांबता जनसेवेची कामे सुरूच ठेवली. यासह नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे मोठे पाठबळ मिळाले. कधी नाही ते कोल्हापूर महानगरपालिकेस कोट्यावधींचा निधी मिळाला. यात प्रामुख्याने नगरविकास विभागामार्फत नगरोत्थान योजनेतून १०० कोटी, मुलभूत सोईसुविधेसाठीचा १५ कोटी, रंकाळा सुशोभिकरणासाठी १० कोटींचा समावेश आहे. याचबरोबर रुग्णसेवा, शैक्षणिक प्रवेश, आरोग्य, रक्तदान शिबिरे याद्वारे लोकांना आपलेसे करण्याचे काम केले आहे. यामध्ये शहरातील सर्वच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचाही मोलाचा वाटा आहे.

परंतु, सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती चक्रव्यूहासारखी असून हे चक्रव्यूह भेदण्यासाठी काही निर्णय घेणे अनिवार्य आहे. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी काही निर्णय घेणे भाग पडत आहेत. पक्षाचा जनाधार टिकावा आणि पक्षवाढ होण्यासाठी कधीही तडजोड केली नाही. गेल्या अनेक वर्षात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ठाम उभे राहिलात त्याचपद्धतीने आगामी काळात पाठीशी राहून, कार्यकर्त्यांची एकसंघता आणि कौटुंबिक वातावरण अबाधित ठेवूया, असे आवाहन  राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले.