पुणे (प्रतिनिधी) : रोज एक आश्वासन देऊन ते न पाळता पलटी मारते. त्यामुळे  राज्यातील सध्याचे ठाकरे सरकार म्हणजे पलटूराम सरकार असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पिंपरी-चिंचवड येथे पुणे पदवीधर –शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, कोरोना काळात वीजेचा वापर नसताना ही भरमसाठ बिले काढण्यात आली आहेत. त्यानंतर वीज बिल माफ करतो, असे म्हणत सरकार आता पलटी मारत आहे. सत्तेवर आल्यापासून सरकारने फक्त एकच काम केले आहे. ते म्हणजे प्रत्येक कामाला स्थगिती देणे. पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. आपली सर्वांची तयारी बघता हा किल्ला आपल्याच ताब्यात राहील. या मतदारसंघातील तरूण उमेदवार संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे. त्यांचा सहकार, शेती, क्रीडा, प्रशासन क्षेत्रातील अनुभव तुमच्या अडअडचणी सोडविण्यासाठी नक्की उपयोगी येईल.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, निरंजन डावखरे, राजेश पांडे, प्रदेश महिला अध्यक्षा उमाताई खापरे, अमित गोरखे,  सचिन पटवर्धन, एकनाथ पवार, केशव घोळवे, बाबू नायर आदी उपस्थित होते.