मुंबई (प्रतिनिधी) : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकाचा भाग असल्याचे वादग्रस्त विधान करून वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.  कर्नाटकचा प्रश्न  हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळाले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये, अशा शब्दांत राऊत यांनी सवदी यांना दम दिला आहे.

राऊत म्हणाले  की मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्या आहे. येथे कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. येथे अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा, असे कधी कुणाला म्हणत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.