कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. राज्यातील इ. १ ली ते  इ. १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांची पाठ्यपुस्तके बालभारतीच्या विभागीय भांडारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था, पुस्तक विक्रेत्यांनी ही पुस्तके मंडळाच्या भांडारांतून खरेदी करून शाळेमध्ये/दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी  केले आहे.

शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनाही पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांत किरकोळ विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. सर्व वर्गांच्या सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके मंडळाच्या मुंबई (गोरेगाव), पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व कोल्हापूर या ९ विभागीय भांडांरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

उपलब्ध माध्यमे  इ. १ ली ते इ. ८ वी – १० माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू, तमिळ व बंगाली), इ. ९ वी व इ. १० वी – ८ माध्यम (मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी व तेलुगू), इ. ११ वी व इ. १२ वी – विज्ञान शाखा (इंग्रजी माध्यम), वाणिज्य व कला शाखा – २ माध्यम (मराठी व इंग्रजी).

कोरोनाच्या साथीमुळे नियमित व्यवहार बंद असून काही शहरांतील दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व पाठ्यपुस्तके मंडळाच्या www.ebalbharati.in या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व पाठ्यपुस्तके मंडळाच्या संकेतस्थळावरुन विनामूल्य डाऊनलोड करून घ्यावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.