मुंबई  (प्रतिनिधी) :  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २४ ऑक्टोबरला ‘गट क’ आणि ३१ ऑक्टोबरला ‘गट ड’ ची परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी  टीईटी परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत राजेश टोपे  म्हणाले की, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची असल्याने टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती करणार  आहे.  तसेच याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) १०  ऑक्टोबरला होणार होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्याने राज्य सरकारने टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता.  दरम्यान, शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आरोग्य विभागाची परीक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर झाल्याने  आता पुन्हा एकदा टीईटी परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.