इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील जुना चंदूर रस्ता परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढून पाठलाग करून कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या दहशतीखाली नागरिक वावरत आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आतापर्यंत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सिराजबी साहेबलाल वाळवेकर (७५),  महादेवी राजाराम हडपद (६०), जीवन श्रीकांत ठाणेकर (३२), मयूर कदम (२२), मृणाली प्रदीप उबाळे (१४) आदी जण जखमी झाले आहेत. तर आज (सोमवार)  सकाळी कल्याणी सिध्दाप्पा तंगडे (वय ८, रा. जुना चंदूर रस्ता परिसर) हिच्यावर एका कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला. तिला आयजीएम रूग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांनी लिंबू चौक परिसराला भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. तसेच पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करु, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक रविंद्र लोहार, माणुसकी फौंडेशनचे रवी जावळे, महेश सुतार आदी उपस्थित होते.