दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

0
60

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा-कॉलेजेस बंद असल्या कारणाने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत आहे व भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 

राज्यातील काही जिल्ह्य़ातील शाळा सुरू झाल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पध्दती सुरू आहे. या कोरोनाच्या काळात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी दाखवलेला संमय व आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षा असून,  या परीक्षा पध्दतीमध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा यावर्षी उशिरा होतील, असे सूतोवाच शिक्षणमंत्र्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा यावर्षी उशिरा म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात व मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विद्यार्थ्यांचे अवलोकन करून शैक्षणिक परीक्षा होतील, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाईल. असे करत असतानाच जिल्हा पातळीवर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम, आधुनिक भौतिक सुविधा, प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या असल्याचेही त्यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीमध्ये शिक्षण विभागाच्या आढाव्यात म्हटले.