अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षांची सक्तमजुरी…

0
85

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी, पाच हजारांचा दंड आणि पीडित मुलीस ५० हजारांची नुकसानभरपाई द्यावी, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. अक्षय भानुदास शिंदे (वय २७, सातवे पैकी शिंदेवाडी, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.  

पीडित अल्पवयीन मुलगी २०१७ साली सातवे पैकी शिंदेवाडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेली असता अक्षयने तिच्याशी ओळख करून घेतली. तिला लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनी  पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिची डॉक्टरांनी तपासणी केली असता गरोदर असल्याचे समजले. काही दिवसांनी तिला मुलगी झाली, पण तिची तब्येत नाजूक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. मात्र, अचानक तिची तब्येत बिघडल्याने त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अक्षय शिंदेंच्या विरोधात पीडितेच्या आईने कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या कामी विशेष सरकारी वकील सौ. अमिता कुलकर्णी यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. तर पीडित मुलगी, फिर्यादी व इतर साक्षीदार यांच्या साक्षी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांच्या जबाब व विशेष सरकारी वकील सौ. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी, पाच हजारांचा दंड आणि पीडित मुलीस ५० हजारांची नुकसानभरपाई अशी शिक्षा सुनावली.