मुंबई (प्रतिनिधी) : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्याशी चर्चा केली.

बैठकीत डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले की, गोवरचा उद्रेक थांबविण्यासाठी सर्वप्रथम ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरविण्यात येण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासाठी लागणारी यंत्रणा, लसीच्या मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय उद्रेक झालेल्या भागात अतिरिक्त डोस देखील नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना देण्यात यावे, असे सांगितले.

या बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य तसेच आयएमएचे सदस्य उपस्थित होते. अडीच तास चाललेल्या या बैठकीत दहा कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा होऊन यात नियंत्रणासाठी पुढील दहा कलमी कृती योजना निश्चित करण्यात आल्या आहेत.