‘या’ मागण्यांसाठी अस्थायी डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर  

0
62

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करण्यासह विविध मागण्यांसाठी अस्थायी डॉक्टरांच्या वतीने आजपासून (सोमवार) सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.

 

राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने सहाय्यक प्राध्यापक अस्थायी स्वरुपात कार्यरत आहेत. सध्या कोरोना महामारीत अस्थायी डॉक्टरांनी दिवसरात्र परिश्रम घेतले आहेत. सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी १५ व १६ ऑक्टोबररोजी काळी फीत लावून आंदोलन केले होते. तसेच अधिष्ठातांच्या दालनासमोर निदर्शनेही केली होती. मात्र, या आंदोलनाची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे अस्थायी डॉक्टरांनी सोमवारपासून (दि.२)  सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनादरम्यान  राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व सहायक प्राध्यापकांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी साडेसहा वाजता कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.

 सहाय्यक प्राध्यापक यांच्या प्रमुख मागण्या :-

1.सर्व तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करून त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात यावे.

2.सर्व तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करताना सर्वांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन नियुक्ती करण्यात यावी.

3.सर्व तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांना तात्काळ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे तसेच प्रथम रुजू झालेल्या दिवसापासून ते आजतागायत पगारातील फरक आयोगाप्रमाणे मिळावा.

विशेष म्हणजे या सर्व तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांनी आपल्या आरोग्याची व जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीमध्ये आतापर्यंत अविरत अखंडित व संपूर्ण निष्ठेने रुग्णसेवा दिलेली आहे. ह्या सर्व सेवेची किमान दखल म्हणून नियमित करण्यात यावे एवढीच अपेक्षा ह्या अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना आहे

दरम्यान,कोरोना काळात डॉक्टरांच्या सामूहिक काम बंद आंदोलना मुळे  वैद्यकीय सेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या विषयी बोलताना डॉ. योगेश पाटील, डॉ. रोहित लोखंडे, डॉ. निखिल जगताप, डॉ. मनोज पाटेकर डॉ ईषा जाधव, डॉ. शिरीन अत्तार व इतर सर्व सहाय्यक प्राध्यापक यांनी सांगितले की, वरील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत  सामूहिक रजा आंदोलन राज्यभर सुरु राहील.