गारगोटी (प्रतिनिधी) : विनापरवाना तोड करून, विनापरवाना वाहतूक करणारा टँम्पो वन विभागाने भुदरगड तालक्यातील बारवे हद्दीत पकडला. काल (शुक्रवार) रात्री उशीरा या वाहनावर व त्याच्या संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गारगोटीचे वनक्षेत्रपाल किशोर आहे, यांनी दिली.

किशोर आहे म्हणाले की,  भुदरगड तालुक्यात अनेकजण राजकिय दबावापोटी मी काहीही करू शकतो असा गैरसमज बाळगून आहेत. निसर्ग ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. अवैध मार्गाने जो कोणी वृक्षतोडीचे असे गैरप्रकार करेल त्याच्यावर शासकिय नियमाप्रमाणे गुन्हे दाखल केले जातील. काल किल्ले भुदरगडच्या पुर्व तटाकडील जंगल परिसरातून गस्त घालताना खासगी मालकीतील ऐन या इमारत लाकडाची तोड करून, भरून नेताना आमच्या पथकाला बारवे येथील हद्दीत रस्त्यावर हा टेम्पो पकडला. त्याच्याकडे काहीही कागदपत्रे आढळली नाहीत. टाटा टेम्पो क्र. एमएच ०९- एल १९७५  असा आहे. यात अंदाजे ऐन जातीच्या वृक्षाचे १४ घनफूट लाकूड आणि सुमारे ३ लाखाहून अधिक किमतीचा हा टेम्पो असा साडेतीन लाखाचा मु्देदमाल आमच्या पथकाने जप्त केला.

अरविंद नारायण भोसले (रा. पिंपळगांव, ता. भुदरगड) असे गाडी मालकाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे   वाहन जप्त करून गारगोटी वनविभागाच्या नर्सरीत पुढील तपासासाठी ठेवण्यात आले आल्याची माहिती वनविभागाने दिली.