कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात टेंबलाईवाडी उड्डाणपूल परिसरात २ फेब्रुवारी २०१४ रोजी पूर्ववैमनस्यातून समीर खाटीक (वय२१), नितीन शिंदे (वय २९) यांचा पाठलाग करून निर्घृण खून केला. याप्रकरणी ९ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने आज (शनिवार) ठोठावली.

जयदीप उर्फ हणंमा राजू चव्हाण (वय २८), साहील ऊर्फ घायल लक्ष्मण कवाळे (२४), रियाज ऊर्फ कालया सदरू देसाई (३२), विशाल सागर गिरी (२१), फारूक अहमद शेख (२८), सद्दाम हुसेन नजीर देसाई (२३), इम्रान राजू मुजावर (२३), धनाजी वसंतराव मिसाळ (२५), रोहीत सुधीर कांबळे (२१) (सर्व रा. टेंबलाईवाडी झोपडपट्टी, विक्रमनगर )  अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.

मयत समीर खाटीक आणि आरोपी साहील कवाळे शेजारीशेजारी राहत होते. पूर्ववैमनस्यातून साहील कवाळे याने समीरच्या घराची तोडफोड करून घर पेटवून दिले. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पुन्हा याच कारणातून संतापातून समीर याने साहील याचा हत्याराने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकऱणी समीर याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता. त्यामुळे एकमेकांविरोधातील आणखीनच वाद चिघळला. तसेच मयत नितीन शिंदे आणि समीर खाटीक यांच्या कॅरम क्लबवरील कामगार अमित हेगडे याने टेंबलाईवाडी झोपडपट्टीतील आरोपी हणंमा चव्हाण याच्याकडून व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड होत नसल्याच्या कारणावरून ३१ जानेवारी २०१४ रोजी हणंमा चव्हाण याने मध्यस्थीसाठी गेलेल्या मयत नितीन शिंदे याला मारहाण केली. त्यामुळे हणंमा चव्हाण याच्याविरोधात फिर्याद दाखल झाली. या कारणामुळे समीर खाटीक आणि, नितीन शिंदे यांच्या खूनाचा कट रचून उड्डाणपुलाखाली आणि कोयस्को चौक येथे त्यांचा पाठलाग करून निर्घृण खून केला होता. तब्बल सात वर्षांनंतर या प्रकऱणी ९ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.