खोटं बोला पण रेटून बोला..!: अशोक चव्हाणांचा फडणवीसांवर निशाणा 

0
38

मुंबई  (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाबद्दल  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विधाने चुकीची आहेत. खोटं बोल पण रेटून बोलं, अशा प्रकारचे त्यांचे विधान आहे. मी कोणतीही चुकीची माहिती विधानसभेत दिलेली नाही. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने जी भूमिका मांडली, तेच मी विधानभवनात सांगितले, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग आणला आहे. यावर उत्तर देताना चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

चव्हाण म्हणाले की, आरक्षण हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीचा विषय नाही. तेव्हा सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता.  यावर राजकारण करू नये. लोकांना उसकवण्याचे काम करू नये. भाजपने राज्यात एक व केंद्रात दुसरी भूमिका घेऊ नये. हक्कभंगाला मी उत्तर देईन,  असे सांगून मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे, हीच आमची भावना आहे.  फडणवीस म्हणतात की, तो जुनाच कायदा आहे व १०२ ची घटनादुरूस्ती लागू होत नाही. मग केंद्र वेगळी भूमिका का घेत आहे? असा सवाल चव्हाण यांनी  यावेळी केला.