मोरेवाडीतील तेजराज मोरे याने मिळवली शाबासकीची थाप…

0
188

कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूरानजीक असलेल्या फुलेवाडी येथील विक्रीकर निरीक्षक अभिनव काळे यांचे पाकीट रिंगरोड, बोंद्रेनगर परिसरात पडले होते. हे पाकीट पन्हाळा तालुक्यातील मोरेवाडी येथील तेजराज मोरे या युवकाला सापडले. त्याने या पाकीटामध्ये असणाऱ्या पत्त्यावर घर शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला घर सापडले नाही.

यावेळी तेजराजने पाकीटामध्ये असणाऱ्या कॉलेजच्या ओळखपत्रावर अभिनवचा मोबाईल नंबर सापडला. या मोबाईलवर संपर्क साधला असता अभिनव काळे यांचे मुळगाव सावर्डे, ता.पन्हाळा असल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने सावर्डे येथे अभिनव काळे यांचे बंधू प्रा. निलेश काळे यांच्या घरी जात प्रामाणिकपणे पाकीट सुर्फूद केले.

या पाकिटामध्ये काही रक्कम, तीन डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड शासकीय कार्यालयाचे ओळखपत्र, लायसन्स असे अनेक महत्वाची कागदपत्रे होती. यावेळी तेजराज मोरे याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत प्रा. निलेश काळे यांनी पुस्तक आणि पुष्प भेट देऊन त्याचे आभार मानले.