करनाल ( वृत्तसंस्था) : हरियाणामधील करनाल जिल्ह्यातील कमला गावात भाजपच्या वतीने किसान महापंचायत रॅली बोलावण्यात आली आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार होते. पण हजारो शेतकरी त्यांचा विरोध करण्यासाठी तेथे जमले आहेत. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न केले पण शेतकऱ्यांनी नकार दिला. पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे.

आजूबाजूच्या परिसरातून शेकडो शेतकरी तेथे जमले आहेत. पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर हे सर्व शेतकरी आता खेड्यापाड्यांकडे व शेतातील धान्याच्या कोठारांकडे गेले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी महापंचायत रद्द केली.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मा. मनोहरलालजी करनालमधील कमला गावातील शेतकरी महापंचायतचे ढोंग बंद करा. अन्नदातांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट थांबवा.