मुंबई (प्रतिनिधी) : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. डिसले यांच्या कार्यातून सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी. तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञान सर्वांना माहिती व्हावी. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन डिसले या कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल होण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.    

तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांना ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत. डिसले हे व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील १४३ हून अधिक देशातील १४०० पेक्षा जास्त शाळांतील मुलांना शिकविण्याचे काम करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी शिक्षण देण्यासाठी डिसले यांनी १६ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरु केले आहेत.

राज्यातील इतर शिक्षकांनाही डिसले यांच्या कामाची ओळख व्हावी. तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी शिक्षक प्रेरणा कार्यशाळा हा उपक्रम सुरु करण्याचे शासनाने ठरविले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना नवा आत्मविश्वास मिळून ते अधिक जोमाने काम करतील, त्याचप्रमाणे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास ना. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.