धुळे (प्रतिनिधी) : कोरोना झाल्याच्या भीतीतून एका शिक्षकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. राजेंद्र भानुदास पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

या शिक्षकाला कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी दिले होते. परंतु अहवाल येण्यापूर्वीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मात्र, त्यांना न्यूमोनिया झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले. कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्षकाच्या नातेवाईकांनी दिली आहे. राजेंद्र पाटील यांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची दुचाकी तसेच डॉक्टरांची फाईल आढळून आली आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.