नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणासाठी स्थापन केलेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिगटाने ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली सर्वश्रेष्ठ बोली आज (शुक्रवार) स्वीकारली आहे. त्यामुळे ७ दशकांनंतर एअर इंडिया कंपनीची मालकी पुन्हा एकदा मूळ मालक असलेल्या टाटा समुहाकडे जाणार आहे.

‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा सरकारकडे आल्या होत्या. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली होती.  तर सर्वाधिक १८ हजार कोटींची बोली ‘टाटा सन्स’ यांनी लावली होती. अखेर मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिली.

निर्धारित राखीव किमतीच्या आधारावर वित्तीय निविदांद्वारे लावलेल्या बोलीचे मू्ल्यमापन केले. त्यानंतर कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर टाटांची निवड करण्यात आली. त्यांनी आपली शिफारस अंतिम निर्णयासाठी केंद्रीय मंत्रिगटाकडे सादर केल्यानंतर त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आला.