कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शहरातून ३० हून अधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याबरोबरच महापौर शिवसेनेचा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. असा निर्धार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला.

शासकीय विश्रामधामवर राजेश क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रभागवार त्रिसदस्यीय निवडणूक पद्धती समजून घेण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत. त्यामुळे कोल्हापूर महानगर पालिकेवरही शिवसेनेचा भडका भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून शहराचा चांगला विकास करता येईल आणि प्रत्येक शिवसैनिकाला चांगली संधी मिळेल. यासाठी शहरात शिवसेनेचे किमान ३० ते ३५ नगरसेवक निवडून आणून महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे. त्यासाठी  योग्य व सक्षम उमेदवार उभे करून त्यांच्या पाठीशी शिवसेनेचे पूर्ण ताकद लावण्याबाबत चर्चा  करण्यात आली. शिवसेनेने निवडणूक स्वबळावर लढवली तरीही हेच लक्ष्य  आणि वरिष्ठाच्या आदेशाने कोणाशीही आघाडी केली तरीही हेच लक्ष्य कायम ठेवून काम करण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रघुनाथ खडके यांनी, शिवसेना पक्षप्रमुखांच्या संकल्पनेनुसार प्रभाग तिथे शाखा आणि घर तिथ शिवसैनिक तयार करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, अशा सूचना केल्या.

माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी, बदललेल्या प्रभाग रचनेनंतर शिवसेनेचे पारडे अधिक जड होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जनहिताच्या कामामुळे शिवसेनेची वोट बँक वाढली असून याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर करण्यास आपण कटिबद्ध राहूया, असे आवाहन केले.

माजी परिवहन सभापती नियाज खान यांनी, राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहरात भगवे वादळ निर्माण झाले असून कोट्यावधी रुपयांचा निधी विकासकामांना मिळाला आहे. त्यामुळे जनसामान्यात शिवसेनेविषयी आस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर होईल यात कोणतीही शंका नसल्याचे सांगितले.

माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांनी, समन्वय साधून इच्छुकांनी कामाला लागावे. संभाव्य भाग समजून घेवून जनसंपर्क वाढवावा. जेष्ठांशी, युवकांशी, भगिनींशी आणि शिवसेनेच्या विचार धारेत सामावणाऱ्यांशी संपर्क साधावा. एकदिलाने काम करून शिवसेनेचा महापौर करण्यास वचनबद्ध राहू, असे प्रतिपादन केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महेश उत्तुरे, सुहास सोरटे, माजी नगरसेवक अजित मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगले, दीपक गौड, किशोर घाटगे, अभिषेक देवणे, रघुनाथ टिपुगडे आदी उपस्थित होते.