कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी)  गोकूळ मधील सत्तातंरानंतर विरोधी आघाडीच्या नेत्यांची सर्व बाजूनेच कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशीच नेत्यांनी टँकरच्या बाबतीत तोंडी आदेश काढला असून या पुढे टँकर कुणाचाही असो, थेट प्रवेश द्यायचा नाही, अशी सक्त ताकीद दिली असून ‘थ्रू पास’ पद्धत बंद करण्यात आले असल्याचे समजते.

दूध वाहतुकीसाठी गोकुळकडे सुमारे दोनशे टँकर आहेत.  जुन्या नेत्यांचे, संचालकांचे आणि त्यांच्या सग्या-सोयऱ्यांचेच टँकर आहेत. मुंबई, पुणे आदी ठिकाणी हे टँकर लाखो लिटर दूध वाहतूक करतात. टँकरमध्येच खरी ‘मलई’ असल्याने त्यावर सर्वांचा डोळा असतो.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे गोकुळकडे सुमारे ४० टँकर आहेत. सकाळी टँकरची गर्दी खूप असते. तर सायंकाळी ही गर्दी कमी असते. रोटेशनप्रमाणे टँकर दूध भरण्यासाठी आतमध्ये सोडणे अपेक्षित होते. पण,  नेत्यांचा टँकर अगोदर भरायचा असा अलिखित नियमच होता. त्यामुळे नेत्यांच्या टँकरला ‘थ्रू’ पास म्हणजेच टँकर कधीही येऊद्या त्याला आतमध्ये थेट प्रवेश दिला जायचा. त्यामुळे नेत्यांचे टँकर भराभर भरून मार्गस्थ होत असत. इतरांना मात्र नोंदणीनंतर जसा नंबर येईल, तसे आत सोडले जायचे. गोकुळ मध्ये सत्तांतर झाले आणि तातडीने कामाची पद्धतही बदलली. नेत्यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी थ्रू पास पद्धती बंद केली आहे. आता टँकर कुणाचाही असू दे कर्मानेच सोडला जाणार आहे. त्यामुळे फेऱ्यांची संख्या आपोआपच कमी होणार आहे.

सध्याचे जे टँकर कार्यरत आहेत. त्यांच्या कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन करार करावे लागणार आहेत. नवीन संचालकांच्या दुसऱ्या बैठकीनंतर त्यासंबंधीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. गोकुळच्या निडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासंबंधी नवीन संचालक काय निर्णय घेतात यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या शिवाय सुपरवायझर यांच्या कामाबाबतही फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. जे कर्मचारी संचालकांच्या निवासस्थानी किंवा शेतावर कार्यरत आहेत, त्यांनाही गोकुळमध्ये काम करावे लागणार आहे. जुन्या संचालकांच्या खास मर्जीतील कर्मचाऱ्यांनाही बाजूला केले जाण्याची शक्यता आहे. अगदी कार्यकारी अधिकारी डॉ. घाणेकर यांचीही उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यापूर्वीच ते स्वतःहून राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

सत्तांतर झाल्याने उट्टे काढण्याचा आणि कोंडी करण्याचा यापुढेही प्रयत्न होणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या मनात नेमका काय बदल होणार याबद्दल धुकधूक लागून राहिली आहे.