इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी पालिकेतून निवृत्त झालेल्या १२५ कर्मचाऱ्यांची उपदान (ग्रॅच्युईटी) मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच दोनशेहून जादा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजेची रक्कमही अजून मिळालेली नाहीये. सफाई कामगारांच्या सुटीच्या पगाराचा मोबदला मागील वर्षापासून मिळालेला नाही. याबाबतचे निवेदन निवृत्त कर्मचारी यांनी तसेच इचलकरंजी नगरपरिषदेकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. नगरपालिकेच्या राखीव निधीतून ही रक्कम मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तथा भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी दिली आहे.

नगरपरिषदेकडून ठेवलेल्या राखीव निधीची रक्कम सुमारे १६ ते १७ कोटी रुपये इतकी आहे. त्याच्या केवळ व्याजातून निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम भागवता येऊ शकते. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचे वेतन सुद्धा गेल्या एक वर्षापासून प्रलंबीत असून ती रक्कम पण यातून मिळावी अशा आशयाचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांना दिले होते. या अनुषंगाने आज (सोमवार) मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व लेखापाल कलावती मिसाळ यांच्या समवेत उपनगराध्यक्ष दालनात बैठक पार पडली. या बैठकीत रवि रजपुते यांनी कर्मचाऱ्यांची मागणी उपस्थित केली. या वेळी झालेल्या चर्चेस अनुसरून या प्रश्नी नगरपरिषदेकडून सादर करणेत आलेला प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणेचा निर्णय करणेत आला.

याकरिता उद्या (मंगळवार) १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यासन ११ येथे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी हेमंत निकम यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढणार, अशी आश्वासक ग्वाही उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिली. या बैठकीत नगरसेवक प्रकाश पाटील, कामगार नेते राजेश रजपुते, तर सुलोचना गुळगे, सरदार सावंत, उमाजी भोरे, रंगराव लाखे या कर्मचारी शिष्टमंडळातील सदस्यांचा समावेश होता.