बांबवडे (प्रतिनिधी) : शित्तुर तर्फ मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक तानाजी तुकाराम पाटील (पिशवीकर) यांना आविष्कार सोशल ॲण्ड एज्युकेशनल फौंडेशनतर्फे ‘राष्ट्रीय बेस्ट टीचर अवॉर्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी केंद्रीय कायदा मंत्री व गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते देऊन पाटील यांना गौरविण्यात आले.

मडगांव (गोवा) येथे आयोजित सभारंभात फौंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. फौंडेशनच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. तानाजी पाटील गेली २६ वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत. या काळात त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. या कार्याची दखल घेत त्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पाटील यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद कोकाटे, सचिव, संचालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.