नवी दिल्ली : भाजपसोबतच्या युतीसाठी आतापर्यंत चारवेळा चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.

शेवाळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत दिल्लीत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचे सूतोवाच केले होते; मात्र जून महिन्यात मोदींसोबत बोलणी झाली आणि जुलैमध्ये भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याच घटनेवर भाजपाचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले होते.

एकीकडे युतीची बोलणी सुरु असताना दुसरीकडे आमदारांवर कारवाई होत आहे, अशी भूमिका घेतली गेली. नाहीतर तेव्हाच युती झाली असती. कित्येक वेळा स्वतः उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली; पण प्रतिसाद मिळाला नाही. या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. एवढेच नाही तर माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला, आता तुम्ही प्रयत्न करा, असेही ठाकरे यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानंतर राहुल शेवाळे आणि इतर खासदार युतीसाठी प्रयत्न करत असताना संजय राऊत यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीसोबत बैठका घेतल्या जात होत्या.