‘त्या’ पत्राची दखल घेत शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन

0
22

मुंबई  (प्रतिनिधी)  : कोकणातील नाणार प्रकल्पबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेत शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्याशी आज (सोमवार) फोनवरून चर्चा केली.

नाणार प्रकल्पाबाबत  मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी आज कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना दिली. कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका.  तो बाहेर जाणे महाराष्ट्रला परवडणार नाही,  असे पत्र राज ठाकरे यांनी पाठवले होते. या पत्राची तत्काळ  शरद पवार यांनी दखल घेतल्याने आता नाणार प्रकल्पाबाबतच्या हालचाली  वेगवान होण्याची शक्यता आहे. आता यावर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.