नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर अपघात  झाल्यावर जखमींना वेळेत रूग्णालयात दाखल न केल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर इतर वाहनधारक पोलिसांच्या चौकशीची कटकट मागे लागू नये, म्हणून अपघातातील जखमींच्या मदतीसाठी पुढे येत नाही. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत एक योजना सुरू केली आहे.  

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना आहे.  या योजनेअंतर्गत जखमींना तत्काळ  रुग्णालयात पोहचवणाऱ्या व्यक्तीला ५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार  आहे. ही योजना १५ ऑक्टोबरपासून संपूर्ण भारतात लागू केली जाणार आहे. भारतीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून याबाबत सूचित केले आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत प्रभावी राहणार आहे.

अपघातातील जखमींना मदत करणाऱ्याला पुरस्कार योजना सुरू  केली आहे. यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना  प्रोत्साहन मिळेल. आणि रुग्णाला त्वरीत उपचार मिळून जीवदान मिळेल,  असे मंत्रालयाने म्हटले आहे.