कोल्हापूर (प्रतिनिधी) :  भारतीय राष्ट्रध्वज हा अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या संवेदनशील विषयी ‘रेड-बबल’सारख्या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांद्वारे, तसेच दुकानांत आणि रस्त्यावर १५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या मास्कची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. राष्ट्रध्वज हे सजावट करण्याचे माध्यम नाही. अशा प्रकारचे मास्क वापरानंतर कचऱ्यात टाकणे इत्यादींमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.

हा राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०, कलम २ व ५ नुसार ; तसेच राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ चे कलम २ नुसार आणि बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. तरी शासनाने या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.