मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील टोलनाक्यांवर आजपासून (दि.१५) वाहन चालकांना ‘फास्टॅग’  बंधनकारक करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील टोलप्लाझांवर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. वाहनांवर फास्टॅग नसताना फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

फास्टॅग असा घ्या…

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह २५ नामांकित बँकेच्या शाखांमधून किंवा ऑनलाइन फास्टॅग विकत मिळेल. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर, पेटीएम, अ‍ॅमेझॉन आणि माय फास्टॅग अ‍ॅपवरही सुविधा उपलब्ध आहे. तसेच, फास्टॅग बँकेत उपलब्ध असून तो २०० रुपयांना मिळतो. हा टॅग कमीत कमी १०० रुपयांपासूनही रिचार्ज करून मिळेल.  ‘फास्टॅग’ची मुदत पाच वर्षांची असेल. त्यानंतर नव्याने टॅग खरेदी करावे लागणार आहे. कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत. तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अ‍ॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत. ज्या वाहनांना फास्टॅग नसेल,  त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जाणार नाही. एप्रिल २०२१ पासूनही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नियमावली कोणती?

* फास्टॅगसाठी वाहनधारकाचे  केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र फोटो आवश्यक

*  एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज मिळणार, बचत खात्याला लिंक करता येणार.

*  डेबिट-क्रेडिट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

*  टोल नाक्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागणार