कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथे गॅस्ट्रो सदृश्य साथीचे रुग्ण सापडले आहेत. याबाबत आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी आरोग्य विभागाची तातडीने बैठक आयोजित करून उपाययोजनांचा आढावा घेतला.

साथ पसरू नये यासाठी तातडीने पावले उचला, गॅस्ट्रो सदृश रुग्णांचे दैनंदिन अहवाल घ्या, अशा सूचना आमदार पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना केल्या. दक्षता म्हणून ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे,  लक्षणे असल्यास रुग्णांनी तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

दऱ्याचे वडगावमध्ये गॅस्ट्रो सदृश रुग्ण आढल्यावर आ. ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाची विचारपूस केली होती. बुधवारी त्यानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. साथीचा फैलाव झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आहे, अत्यावश्यक सेवा म्हणून उपयुक्त औषधसाठा उपलब्ध असल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले. ही साथ गॅस्ट्रोची नसून तो अतिसार आहे. रमाई आवास घरकुल ठिकाणी याचा फैलाव झाला असून, पिण्याच्या पाण्याची पाईपला गळती लागल्याने साथ पसरल्याचे त्यांनी सांगितले. पाणी गळतीबाबतचे फोटोही आरोग्य विभागाने आ. पाटील यांना सादर केले. सध्या ही साथ आटाक्यात आल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले.

सध्या गावाला टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गावासाठी जो पाण्याचा शिल्लक साठा आहे. तो वापरात आणताना आरोग्य विभागाची परवानगी घेऊनच पाणी वापरले जावे, अशी सूचना डॉ. साळे यांनी सरपंचांना केल्या. बैठकीला जि.प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे,  करवीर पं.स. चे गटविकास अधिकारी विजय यादव, करवीर तालुक्याचे आरोग्य अधिकारी फारुख देसाई, सरपंच अनिल मुळीक,  इस्पुर्ली आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक महादेव घोडके, रामदास मनगुटे, विजय शिंदे उपस्थित होते.