रांगोळी (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात. मात्र, हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचर्‍यात किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना होत असते. त्यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे, हे कायदाबाह्य ठरते. तरी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने हुपरीचे मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांच्याकडे केली.

हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष राजाभाऊ वाईंगडे, स्वीकृत नगरसेवक सुभाष कागले यांच्या उपस्थितीत निवेदन स्वीकारल्यावर मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाच्या प्रबोधनासंदर्भात तयार केलेली ध्वनीचित्रफित प्रसारित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. तसेच सदरचे निवेदन हुपरीतील सर्व शाळा, पोलीस ठाण्याला देण्यात आले.

यावेळी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे शहराध्यक्ष नितीन काकडे, सद्गुरु बहुउद्देशीय संस्थेचे रवींद्र गायकवाड, रामभाऊ मेथे, संभाजी काटकर, प्रसाद देसाई, गणेश घोरपडे, ओंकार फडतारे, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे आदी उपस्थित होते.