कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई कामगार यांच्या संयुक्त बैठकीत आमदार पाटील बोलत होते.

या निर्णयामुळे रेसकोर्स नाका आणि शिवाजीपेठ येथील मूळ जागेवर सात मजली इमारतीचे नियोजन करून सुमारे १३८ सफाई कामगार कुटुंबांना कायमचा आणि हक्काचा निवारा मिळणार आहे.

महापालिकेमध्ये सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय संभाजीनगर येथील रेसकोर्स नाक्याजवळील कामगार चाळीत आणि शिवाजीपेठ परिसरातील बैठ्या चाळीत भाडेतत्त्वावर करण्यात आली आहे. रेसकोर्स नाका येथील कामगार चाळीमध्ये सध्या सफाई कामगारांची ९७ कुटुंबे, तर शिवाजीपेठ येथील बैठ्या कामगार चाळीमध्ये ४१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे सफाई कर्मचारी राहत असलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे.

यावेळी माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी सफाई कामगारांच्या घराबाबतची सद्य:परिस्थिती आणि उपाययोजनांबाबतची सविस्तर माहिती दिली. रेसकोर्स नाका कामगार चाळ आणि शिवाजी पेठ येथील बैठ्या कामगार चाळ अशा एकूण १३८ कुटुंबांसाठी नव्याने गृहप्रकल्प उभारावा. याबाबत योग्य ते नियोजन करून त्यावर लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

हा गृह प्रकल्प सात मजली इमारतीमध्ये होणार असून, सफाई कामगारांना प्रत्येकी ३५० स्क्वेअर फुटाचे स्वमालकीचे घर मिळणार आहे. या निर्णयामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत आणि सध्याचा रेडीरेकनर दर यावर या इमारतीमधील प्रत्येक घरांची किंमत ठरणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी नमूद केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपायुक्त रविकांत अडसूळ, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उपशहर अभियंता एन.एस. पाटील, नगररचना सहाय्यक संचालक रमेश मस्कर प्रधानमंत्री आवास योजनेचे विशेषज्ञ युवराज जबडे यांनी गृहप्रकल्पाविषयी माहिती दिली.

यावेळी सुयोग मगदूम, किशोर यादव, प्रदीप चौगुले, नंदकुमार मराठे, आशीष खोराटे, अनिल पटवणे, हेमंत पटवणे, चेतन सोनवणे, अतुल बनगे, राजू चंडाळे, शब्बीर शेख, रतन पच्छरवाल, सुनील गोहिरे व सफाई कामगार उपस्थित होते.