इचलकरंजी (प्रतिनिधी) : यंत्रमागधारकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याबरोबरच सूताची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज (बुधवार) मनसेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात  निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदरचे निवेदन स्वीकारले.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे चुकीचे धोरण आणि यंत्रमाग उद्योगात तेजी -मंदीचे चक्र सुरुच आहे. त्यामुळे हा उद्योग बेभरवशाचा झाला आहे. त्यातच  काही व्यापाऱ्यांनी मनमानी करत सूताची साठेबाजी केली आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. परिणामी, या उद्योगातील आर्थिक नुकसानीमुळे यंत्रमागधारक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. तरी सूताची साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, छोट्या यंत्रमागधारकांना कर्जाच्या व्याजदरात सवलत मिळावी, काही फायनान्स व बँकांनी सुरु ठेवलेली अन्यायकारक कर्जाची वसुली थांबवावी, वसुलीसाठी गुंडगिरी करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करत याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर, शहराध्यक्ष प्रताप पाटील, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, योगेश तिवारी, शहाजी भोसले, रामा बागलकोटे, राजेंद्र निकम, बी.बी.राजमाने, विनायक मुसळे, महेश शेंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.