कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. तसेच दुकानातून, आँनलाईन पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील होत असलेल्या मास्कच्या विक्रीवर बंदी घालावी, अशा मागण्या आज (मंगळवार) हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात. मात्र, हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत फाटलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात. तर प्लास्टिकचे राष्ट्रध्वज लवकर नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाची विटंबना होते. त्यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्री, उत्पादनावर बंदी घालून राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवसेनेचे राजू यादव, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना उपशहर प्रमुख शशीभाऊ बीडकर, हिंदू एकता समितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बराले उपस्थित होते.