कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकचे ध्वज, तिरंगा मास्क विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आज (मंगळवार) हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे गांधीनगर पोलिसांना देण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जनजागृती, संबंधित प्रशासनास निवेदन देण्यात येत आहे. ज्या व्यक्ती, दुकाने, आस्थापना, संघटना अथवा समूह आदी राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिले. हे निवेदन पोलीस हवालदार बजरंग हेबाळकर यांनी स्वीकारले.

यावेळी शिवसेनेचे गांधीनगर शहरप्रमुख दिलीप सावंत, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.