टोप (प्रतिनिधी) : शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत सुमारे ३० हजार लोकांना कोविड लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. गेल्या ८ दिवसांमध्ये ८ हजार लसीकरण करणे आवश्यक आहे. परंतु फक्त ५१० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हा आकडा अत्यंत कमी आहे. जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्रांताधिकारी विकास खरात यांनी गट विकास अधिकारी शबाना मोकाशी व तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे यांना दिल्या.

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत येणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण मोहीमेच्या आढावा बैठकीत खरात बोलत होते. यावेळी त्यांनी लसीकरण कमी झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करून अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, आशा सेविका यांना खडे बोल सुनावले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, गावकामगार तलाठी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत यांनी लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती केली नाही, असे सांगून खरात यांनी कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांना नोटीस बजावून कारवाई करा. शिरोली, नागाव व टोप ही गावे कोरोनाच्या संसर्गात हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. येथ लसीकरण मोहीम व्यापक करावी, अशा सूचनाही खरात यांनी दिल्या.

यावेळी तहसीलदार डॉ. प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे, मंडल अधिकारी बी.एल.जाधव, वैद्यकीय अधिकारी अनुराग बारसिंग, सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका आदी उपस्थित होत्या.