घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा : उज्ज्वल कोल्हापूर संघटना  

0
89

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरफाळा चौकशी समितीच्या अहवालानुसार प्रभारी करनिर्धारक संजय भोसले व इतर कर्मचारी दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. तरी त्यांच्यावर निलंबनाची व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेचे गणेश लाड यांनी महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.

 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका घरफाळा चौकशी समितीने घरफाळा घोटाळ्यातील ३ कोटी १८ लाख रुपये नुकसानीस प्रभारी करनिर्धारक संजय भोसले व इतर कर्मचारी जबाबदार असल्याचे आपल्या अहवालात सिद्ध झालेचे नमूद केले आहे. याबाबत तत्कालीन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी १६ ऑगस्ट  २०२० रोजी महापालिका उपायुक्त निखील मोरे यांना या अहवालाप्रमाणे त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

घरफाळा किंवा पाणीपट्टी वेळेत न भरल्यास प्रशासनाकडून लगेच कारवाई केली जाते. परंतु जनतेने भरलेल्या करावर डल्ला मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार ?, जर का दोषीवर कोणतीच कारवाई होणार नसेल, तर कोल्हापूर महापालिका बरखास्त करण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी उज्वल कोल्हापूर संघटनेचे ओंकार रामशे, अजित पाटील, किरण गायकवाड साहेबराव काशिद, योगेश दलबंजन आदी उपस्थित होते.