कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वळीवडे येथील अमोल चंद्रकांत शिर्के या कोरोना रुग्णावर डॉ. समीर वाडीलाल शहा यांनी बेकायदेशीररित्या उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून कारवाईस विलंब होत असल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश मारुती कांबळे (रा. उंचगाव) यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, अमोल शिर्के या गवंडीकाम करणाऱ्या तरुणावर डॉ. शहा यांनी पाच दिवस उपचार केले. अखेर रुग्ण गंभीर झाल्याने डॉ. शहा यांनी आपल्या कारमधून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेले. सीपीआरमध्ये नेत असताना अमोल शिर्के यांच्या पत्नीला डॉ. शहा यांनी सांगितले की, मी डॉक्टर असल्याचे आणि मी त्याच्यावर उपचार केल्याचेही सांगू नका. दरम्यान, सीपीआरमध्ये गंभीर स्थितीत असलेल्या अमोल शिर्के यांचा स्वॅब घेण्यात आला आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मात्र, हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा रिपोर्ट मृत अमोल शिर्के यांच्या पत्नीस सीपीआरमध्ये देण्यात आला. डॉ शहा यांनी प्रारंभी अमोल शिर्के या कोरोना रुग्णावर चार-पाच दिवस सदोष आणि चुकीचे उपचार केले. कोरोना सेंटरसाठी लागणारी कोणतीही शासकीय परवानगी न घेता उपचार केले. संबंधित कोरोना रुग्णाची माहिती कोरोना ग्राम दक्षता समिती अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. शहा यांनी दिली नाही. त्यांच्या सदोष, हलगर्जीपणाच्या बेकायदेशीररित्या केलेल्या उपचारांमुळेच गरीब कुटुंबातील गवंडी काम करणाऱ्या अमोलचा बळी गेला. त्याची पत्नी व दोन लहान मुले निराधार झाली.

त्यामुळे प्रशासनाला तक्रार देऊनही या डॉक्टरवर कारवाई झाली नाही. उलट त्यांनी क्लीनिक सुरू ठेवून संसर्ग वाढविला आहे. प्रशासन आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे, असा सवाल महेश कांबळे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

दरम्यान, वळीवडे ग्रामपंचायतीने डॉ. शहा यांना नोटीस बजावली असून कारवाईबाबत तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला आहे, असे सरपंच अनिल पांढरे यांनी सांगितले. मात्र कारवाईबाबत विलंब होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. संबंधित डॉक्टरवर ताबडतोब कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा रामभाऊ साळुंखे, वीरेंद्र भोपळे, राजू कांबळे, सचिन शिर्के व महेश माळी या विविध पक्ष, संघटनाच्या कार्यकर्त्यांनीही दिला आहे.