छ. शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलाव सुरु करावा : जिल्हा नागरी कृती समितीची मागणी

0
73

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसापूर्वी खेळ, क्रीडांगणे सुरु करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. पण छ. शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव आजअखेर चालू झालेला नाही. त्यामुळे कित्येक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचे नुकसान होत आहे. तर येथे बांधलेल्या नवीन व्यायामशाळेचाही वापर केला जात नाही. हे सुरू करावेत यासाठी आज (शुक्रवार) कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांना निवेदन देण्यात आले.

छ. शिवाजी स्टेडियम येथे तळमजल्यावर व्यायाम शाळेसाठी हॉल उपलब्ध असताना सात ते आठ लाख अनावश्यक खर्चुन वरच्या मजल्यावर नविन व्यायामशाळा बांधली. या व्यायाम शाळेचा अजूनही  वापर केला जात नाही. त्यामुळे यावर विनाकारण केलेला खर्च जलतरण तलावाच्या डागडूजीसाठी वापरला असता तर हा तलाव खेळाडूंसाठी वापरला जाऊन त्यापासून शासनाला उत्पन्न चालू होऊन खेळाडूंची सोय झाली असती. इथले लाईट कनेक्शनही कट केले आहे, पाणी फिल्टर प्लँटही बंद आहे त्याची दुरुस्ती अदयापि झालेली नाही. इतर किरकोळ दुरुस्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे जलतरण तलाव चालू झालेला नाही अशी उत्तरे कर्मचाऱ्याकडून दिली जातात.

हा तलाव बंद असल्यामुळे कित्येक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचे नुकसान होत आहे. याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार आहेत. २० ऑगस्ट २०२० रोजी क्रीडादिनाच्या दिवशी जाहीर कार्यक्रमात अनेक संस्थांना पाच-पाच लाखाच्या क्रीडा साहित्यांचे वितरण केले होते. पण प्रत्यक्षात हे साहित्य अदयापी पोहचलेली नाही. क्रिकेटच्या मैदानाचेही काम केलेले नाही, मैदानावर दगड कचरा, काचा आणि खड्डयांचे साम्राज्य आहे यासह अनेक प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणूंग, यशवंत वाळवेकर, राजाराम सुतार, लहु शिंदे, महादेव जाधव, चंद्रकांत पाटील, विजय सरदार, एस. एन. माळकर, किशोर घाडगे, अश्विन माळी आदी उपस्थित होते.