गोडसाखर : तुमचा होतो खेळ पण, आमचा जीव जातोय..!

0
1890

कोल्हापूरी ठसका…

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : तुम्हाला लहानपणीची एक गोष्ट आठवत असेल. ‘एक होते तळे. त्यात होते बेडूक. बाजूला होते मैदान. तेथे मुले खेळत. खेळ म्हणून तळ्यात दगड फेकत. पाणी उंच उडे. मुलांना गंमत वाटे…’ अशा त्या गोष्टीत पुढे एका बेडकाने बाहेर येऊन मुलांना सांगितले, ‘तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो…

‘गोडसाखर’ बाबत विचार केल्यास आता असंच कुणीतरी सभासद, ऊसउत्पादक किंवा कर्मचाऱ्याने बाहेर येऊन या राजकारण्यांना सांगायची वेळ आली आहे, ‘की बाबांनो आत्ता बास करा तुमचा खेळ… आमचा जीव चाललाय’..!

‘ब्रिस्क’ने करारपूर्व दोन वर्षे आधीच कारखाना संचालकांच्या ताब्यात दिला आणि यांच्या खेळात रंग चढलाय. मुळात कारखाना म्हणे तोट्यातचं चालवलाय आणि वर करारबाह्य देणीही दिलीत, खरंतर इथूनच रंग पसरायला सुरुवात झाली होती. मग कारखाना संचालकांनी ताब्यात घेतल्यावर ‘गळीत हंगामाची’ तयारी करायची सोडून एकमेकांचे रंग ओळखण्याच्या प्रयत्नात चार-पाच महिने गेले. मग उणे नेटवर्थ, अर्थसहाय्यची अडचण बघत कारखाना चालवायला द्यायचं ठरलं. आजी-माजी चेअरमननी सर्व संचालकांना साक्षी ठेऊन गळ्यात गळे घालून सभासदांकडे ठराव मागितला. पूर्व आणि पश्चिमेचा एक रंग पाहून बिचाऱ्या सभासदांच्या तोंडून आपसूकच आलं… ‘मंजूर..’!

हा ठराव अंतिम मंजुरीसाठी सहकार मंत्र्यांच्या दारात जाईपर्यंत पुन्हा याचा रंग बदलला…कारण, कुणाचं कांहीच ‘फिक्स’ होत नव्हतं…म्हणून शेवटी तो डावचं मोडायचा ठरलं आणि मोडलाही. नंतर मात्र रंगांचे गट झाले. एका गटाने ‘गळीत’ सुरू करण्यावरून चेअरमन-व्हा. चेअरमनना आरोपीच्या पिंजऱ्यातचं उभं केलं. मुसद्दी चेअरमननी मग ‘गळीत’चा पिंजराचं असा फिरविला की, आतले ‘बाहेर’ आणि बाहेरचे ‘आत’ वाटू लागले…या ‘आत-बाहेर’च्या खेळात मग सगळ्यांचे मिळून दोनच गट बनले आणि एक गट राजीनाम्याला पोहचला. आता राजीनामा देऊन बाहेर आलेले १२, तर आत असलेले ६ आहेत.

प्रशासक आल्यावर ते ६ पण बाहेरचं असणार अशीही चर्चा सुरुय. पण त्यामुळे मायबाप सभासदांना वकिलांचा सल्ला घेऊनही कळेना झालंय की शेवटी ‘आत’ कोण राहणार..? आणि ‘आत-बाहेर’च्या प्रश्नापेक्षा त्यांच्या ऊसाचे पैसे कोण देणार..? तयार असलेली साखर कोण विकणार ? त्यातून कामगारांना पगार मिळणार की घेतलेल्या ठेवी भागवणार ?.

असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी सभासदांच्या, कर्मचाऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, तोडणी-वाहतूकदारांच्या डोक्यावर मुलांनी टाकलेल्या दगडासारखे आदळत आहेत. पण सगळेच बेडकांसारखे हतबल आहेत. ‘तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो’…वाटतंय अनेकांना कुणीतरी सांगायला हवं…पण…सांगणार कोण ?